*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: बोगस ठरावांच्या आरोपावरून राजकारण तापले; आमदार सुभाष देशमुख यांची सहनिबंधकांकडे तक्रार*
*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: बोगस ठरावांच्या आरोपावरून राजकारण तापले; आमदार सुभाष देशमुख यांची सहनिबंधकांकडे तक्रार*
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रात राजकीय तणाव वाढला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये कथित बोगस ठराव मंजूर करून मतदार यादी तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप करत आमदार सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याची प्रक्रिया मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. या ठराव सादर करण्याची मुदत ११ सप्टेंबरपर्यंत आहे. आमदार देशमुख यांच्या तक्रारीनुसार, काही संस्थांमध्ये सभासद व संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडिंग बुकवर सह्या घेतल्या जात आहेत. अधिकृत कार्यालयाबाहेर नियमबाह्य ठराव घेण्याचे प्रकारही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बोगस ठरावांच्या आधारे मतदार यादी तयार झाल्यास पात्र सभासद व संस्थांच्या संचालकांवर अन्याय होईल आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त करत देशमुख यांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही विकास संस्थांच्या गटसचिवांच्या बेकायदेशीर बदल्या रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये तेलगाव विकास सोसायटी, दिंडूर-होटगी आणि बाळगी-औज मंडळातील मंद्रूप विकास सोसायटी यांचा समावेश आहे.
यापूर्वीच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण १ हजार २९० सोसायट्यांपैकी थकबाकीमुळे ७०८ सोसायट्या अपात्र ठरल्या आहेत. संचालकपदासाठी केवळ ५८४ सोसायट्या पात्र आहेत. विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदारसंघातून १९ पैकी ११ संचालक निवडले जातात. सुमारे पाच हजार कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या या बँकेवर पारंपरिक वर्चस्व असलेल्या पक्षांविरुद्ध भाजपनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आमदार देशमुख यांनी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून बोगस ठरावांवर आधारित मतदार यादी तयार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या