*शेताच्या बांधावरून वाद: पिंपरी (पा) येथे शेतीच्या बांधावरील तुरी उपटल्याच्या कारणावरून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला.*

*शेताच्या बांधावरून वाद: पिंपरी (पा) येथे शेतीच्या बांधावरील तुरी उपटल्याच्या कारणावरून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला.* 

*KDM NEWS प्रतिनिधी, वैराग | २८ ऑगस्ट २०२६ बार्शी तालुक्यातील पिंपरी (पा) येथे शेतीच्या बांधावरील तुरी उपटल्याच्या आरोपावरून चार जणांनी एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचे दांडे, लोखंडी गज, दगड आणि लाथाबुक्क्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तो मागील तीन वर्षांपूर्वी गावातील शिवाजी नेमिनाथ भोसले यांच्याकडून सव्वादोन एकर शेती विकत घेतली होती. या शेतीच्या लगतच रामा गणपत भोसले यांची शेती आहे. त्यानंतर रामा गणपत भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता घडली. फिर्यादी शेतातील पाण्याचे दार मोडण्यासाठी गट क्रमांक २९० मधील शेतात गेला होता. त्यावेळी शेजारील शेतात रामा गणपत भोसले व ओंकार रामा भोसले स्पिंकलरचे पाईप जोडत होते. त्यांनी फिर्यादीला “तुम्ही आमच्या शेताच्या बांधावरील तुरी का उपटल्या?” असे म्हणत शिवीगाळी व दमदाटी सुरू केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर रामा भोसले यांनी मोठ्याने ओरडून ओम रामा भोसले व नागनाथ बाबू भोसले यांना बोलावले. ओम रामा भोसले यांच्या हातात लोखंडी गज तर नागनाथ भोसले यांच्या हातात दगड होता.

नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार रामा भोसले यांनी जवळच पडलेली कुऱ्हाड उचलून “हा सारखा त्रास देतोय, आता सोडायचे नाही” असे म्हणत कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीच्या हाताच्या दंडावर, डोक्यावर व पाठीवर वार केले. ओम रामा भोसले यांनी लोखंडी गजाने हात व पाठीवर मारहाण केली. नागनाथ बाबू भोसले यांनी दगडाने डाव्या डोळ्याखालील भागावर वार केला. रामा गणपत भोसले यांनी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर चारही जण शिवीगाळी व दमदाटी करत निघून गेले.

फिर्यादीने घरी जाऊन पत्नी कुसूम, भाऊ अरविंद व नातेवाईक आश्रम वायकर यांना घटना सांगितली. वैराग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी जखमा पाहून दवाखाना यादी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग येथे उपचार घेतल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे रेफर करण्यात आले. तेथून परत येताना त्रासामुळे वैराग येथील मोटे हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेतले. त्यानंतर २५ ऑगस्ट २०२६ रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली.

याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल क्रमांक ०३३७/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपी म्हणून ओंकार रामा भोसले, ओम रामा भोसले, नागनाथ बाबू भोसले व रामा गणपत भोसले (सर्व रा. पिंपरी पा, ता. बार्शी, जि. सोलापूर ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**