**प्रेमभंगानं उघडला एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीचा घोटाळा; सहा जण अटकेत, भरती रद्द**

*प्रेमभंगानं उघडला एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीचा घोटाळा; सहा जण अटकेत, भरती रद्द* 

*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदाच्या चाळणी परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार प्रेमभंगानं उघडकीस आला. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून एमपीएससीने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे.

२२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे ४४,५०० उमेदवार बसले होते. १५४ राजपत्रित पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर ऋतुजा पाटील यांना सातवी क्रमांक मिळाला. मात्र त्यांचा प्रियकर लोकेश उर्फ गौरव राजेंद्र पाटील (२४, नंदुरबार) अपात्र ठरला.

पोलिसांच्या तपासात समोर आले की, परीक्षेच्या दोन-तीन दिवस आधी नंदुरबार येथील कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यामार्फत प्रश्नपत्रिका मिळवली गेली. ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील यांना सुमारे पाच लाख रुपये देऊन ही व्यवस्था केली. प्रश्नपत्रिका एमपीएससीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने मिळवली गेल्याचा आरोप आहे. ऋतुजाने ही प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर गौरवलाही पाठवली. गौरवानेही त्याचा वापर केला, पण तो नापास झाला.

निकालानंतर संबंध बिघडले. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला आणि ऋतुजा अधिकारी होऊन दूर जाईल, या भीतीपोटी गौरवाने जुलै २०२६ मध्ये एमपीएससीकडे ई-मेलद्वारे तक्रार केली. त्याने सांगितले की, १०० पैकी सुमारे ८०-९० प्रश्न आधीच उपलब्ध होते. त्यानंतर त्याने तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि ‘बनाव रचला होता’ असेही म्हटले, पण चौकशी सुरू झाली होती.

गुन्हे शाखेच्या तपासात गौरव स्वतः प्रश्नपत्रिका मिळवणारा आणि वितरित करणारा असल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंढवे, सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे, प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील यांचा समावेश आहे. ऋतुजाला नोटीस बजावण्यात आली आहे. आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

एमपीएससीने २६ ऑगस्टला भरती प्रक्रिया रद्द केली. फेरपरीक्षा स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल. तपास सुरू असून प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**