**पुण्यातील इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द; सहा आयुर्वेदिक औषधांत बुरशी, अळ्या आणि कीटक आढळले**

**पुण्यातील इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द; सहा आयुर्वेदिक औषधांत बुरशी, अळ्या आणि कीटक आढळले** 

*KDM NEWS प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील जेजुरी एमआयडीसी येथील इंड्युकेअर फार्मा प्रा. लि. या आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनीचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) आणि औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

शासकीय विश्लेषणात कंपनीच्या सहा आयुर्वेदिक औषधांचे नमुने ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’ (एनएसक्यू) म्हणून घोषित करण्यात आले. यात सिंहनाद गुग्गुळमध्ये बुरशीची वाढ, गोळ्यांवर काळे डाग आणि मायक्रोबियल लिमिट टेस्ट अयशस्वी; पुनर्नवादी मंडूरमध्ये बुरशी आणि मायक्रोबियल लिमिट उल्लंघन; त्रिफळा गुग्गुळमध्ये मायक्रोबियल मर्यादा ओलांडली; कांचनार गुग्गुळमध्ये टोटल मायक्रोबियल काउंट तसेच यिस्ट व मौल्ड मर्यादेपेक्षा जास्त; हिंगवाष्टक चूर्णामध्ये टोटल अॅश जास्त असून अळ्या, कीटक व बाह्य अशुद्ध पदार्थ; तर त्रिफळा चूर्णामध्ये गुठळ्या तयार होऊन अळ्या, कीटक व अशुद्ध पदार्थ आढळले.

तपासणीत आढळले की, मंजूर फॉर्म्युलेशननुसार कच्चा माल वापरल्याचे रेकॉर्ड नव्हते. बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड अपूर्ण व विसंगत होते. साफसफाई, यंत्रसामग्री, प्रक्रिया वैधता, कच्च्या मालाची गुणवत्ता तपासणी, कीटक नियंत्रण आणि तापमान-आर्द्रता नियंत्रण यांचे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. उत्पादन क्षेत्र अस्वच्छ, जाळ्या खराब, फिल्टर घाणेरडे आणि कागद यंत्रात वापरलेले आढळले. मायक्रोबायोलॉजिकल चाचण्यांसाठी आवश्यक प्रयोगशाळा, उपकरणे व नियंत्रणही नव्हते. काही औषधांत अनिवार्य घटकही गहाळ होते.

एफडीएने कंपनीला उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले व शो-कॉज नोटीस बजावली. वैयक्तिक सुनावणीत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू राहील.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**