**मुख्यमंत्री_फडणवीसांची_दिल्लीत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण बैठक; पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी सहकार्य मागितले**

**मुख्यमंत्री_फडणवीसांची_दिल्लीत पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण बैठक; पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी सहकार्य मागितले** 

KDM_NEWS_प्रतिनिधी_नवी_दिल्ली, १७ ऑगस्ट : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील प्रमुख प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशीही स्वतंत्र चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती आणि केंद्राच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाकांक्षी कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील अनेक प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सादर केले.

पुणे मेट्रो-३ प्रकल्पाबाबत विशेष चर्चा झाली. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या चाचण्या सुरू आहेत. देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीची ही मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर प्रकल्पावर विशेष भर देण्यात आला. सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) मार्फत वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे. प्रकल्पाचा मोठा आर्थिक आवाका लक्षात घेता जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण निधी उभारता येईल का, याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक पर्याय सुचविला. महाराष्ट्र शासनाने याला सहमती दर्शविली असून पुढील काळात संबंधित संस्थांशी समन्वय साधून प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीत राज्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण व वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे अनेक पायाभूत कामांना विलंब होत असल्याने त्यांना गती देण्यासाठी सहकार्य मागितले.

पंतप्रधानांसोबतची भेट सकारात्मक आणि फलदायी ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वीही महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितले असता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर या दौऱ्यात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने अधिक गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

KDM NEWS प्रतिनिधी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**