*दत्तक गावातच अवैध दारूचा बाजार; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या गावातील कारवाईने उडाली खळबळ*
*एसपींचे दत्तक गाव अन् दारूचा महापूर! बार्शीच्या धस पिंपळगावमध्ये ८० हजारांच्या अवैध दारूसह दोघांवर कारवाई*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी *सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आज धस पिंपळगाव येथे धडक कारवाई केली. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन आरोपींना अटक केली असून देशी-विदेशी दारू मिळून एकूण ८० हजार २९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
धस पिंपळगाव येथे काही इसम अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून छापा टाकला. या कारवाईत संतोष अर्जुन धस आणि दिनेश कैलास धस (दोघेही राहणार धस पिंपळगाव, ता. बार्शी, ) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून दारू, मटका, जुगार आणि इतर अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवल्या आहेत. धस पिंपळगाव हे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दत्तक घेतलेले गाव असल्याने येथे झालेल्या या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, सोमनाथ खांडेकर, स्वाती डोईफोडे, प्रदीप जगताप, गोविंद बचुटे, रमेश माने आणि शशिकांत लोकरे यांचा सहभाग होता.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या