**सत्संगरूपी सूर्योदयाने अज्ञानरात्रीचा अस्त : बार्शीत जयवंत महाराज बोधले यांचे श्रीमद्भागवत निरूपण**
**सत्संगरूपी सूर्योदयाने अज्ञानरात्रीचा अस्त : बार्शीत जयवंत महाराज बोधले यांचे श्रीमद्भागवत निरूपण**
#KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १७ ऑगस्ट : बार्शीतील श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमालेत प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी ‘श्रीमद्भागवत’ या विषयावर निरूपण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सत्संगरूपी सूर्याचा उदय झाला की अज्ञानरूपी रात्रीचा अस्त होतो.
२२ वर्षांची परंपरा लाभलेल्या या प्रवचनमालेत बोधले महाराजांनी भागवतातील विविध प्रसंगांच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि भक्ताचे परमात्म्याशी असलेले नाते स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, राजा परीक्षिताने शुकमुनींना सृष्टीच्या रचनेचे रहस्य विचारले होते. तसेच उद्धव आणि मैत्रेय यांच्यातील तत्त्वज्ञानाच्या चर्चेचे मर्म जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती. उद्धव आणि विदुर यांची भेट व त्यांच्यातील संवाद हा ज्ञानाचा मोठा खजिना आहे. हे दोघेही श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते.
श्रीकृष्ण साक्षात भगवंत परमात्मा असून ज्ञान, लक्ष्मी, ऐश्वर्य, वैराग्य, औदार्य आणि यश हे सद्गुण त्यांच्यात एकवटलेले आहेत. उद्धव आणि विदुर हे श्रीकृष्ण परमात्म्यामध्ये पूर्ण विलीन झालेले भक्त होते. भक्ताला परमात्म्याच्या स्मरणाने डोळ्यांत अश्रू येणे ही भक्तीची पहिली पायरी आहे, तर परमात्म्यालाच भक्ताची आठवण होणे ही भक्तीची परमावस्था आहे, असे महाराजांनी अधोरेखित केले.
श्रीकृष्ण निजधामाला जाताना उद्धवाला आपले सर्व ज्ञान दिले. त्यामुळे उद्धव हा श्रीकृष्णरूपी परमात्म्याच्या ज्ञानपरंपरेचा वारसा लाभलेला भक्त आहे. उद्धवाचे स्वामी साक्षात परमात्मा असल्याने उद्धव-विदुर संवाद ज्ञान आणि बोध देणारा आहे.
श्री भगवंत मंदिरात या प्रवचनासाठी हजारो भाविक उपस्थित होते.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या