*बार्शी तालुक्यात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचे छापे; ५ जण अटकेत, मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त*
*बार्शी तालुक्यात खाकीचा दणका: अवैध दारूविक्री करणाऱ्या ५ जणांवर धडक कारवाई!*
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**सोलापूर, २९ ऑगस्ट :** बार्शी तालुका पोलीस ठाण्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत अवैध दारूच्या साठ्यावर आणि विक्रीवर मोठी कारवाई केली. २७ व २८ ऑगस्ट रोजी तालुक्यातील आगळगाव, धनगरवाडी आणि धसपिंपळगाव परिसरात झालेल्या छाप्यांत पाच आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत सुमारे ४,००० रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली.
२७ ऑगस्ट रोजी आगळगाव येथे निलाबाई शंकर चव्हाण (वय ६०) यांच्याकडून ९ लिटर हातभट्टीची देशी दारू (किंमत ९०० रुपये) जप्त करण्यात आली. त्याच दिवशी धसपिंपळगाव येथे संतोष अर्जुन धस (वय ५१) यांच्याकडून रॉयल स्टॅग, क्लासिक गोल्ड व्हिस्की व देशी दारूच्या बाटल्या (एकूण २,७०० रुपये) तसेच काळ्या रंगाची हिरो एचएफ डीलक्स मोटारसायकल (आरटीओ क्रमांक एमएच १३ बीयू ५११२) जप्त करण्यात आली. एकूण मालमत्ता सुमारे ७७,७०० रुपये इतकी आहे. त्याच गावात दिनेश कैलास धस (वय ३४) यांच्याकडून क्लासिक गोल्ड, मॅकडॉल्स व्हिस्की आणि देशी दारूच्या बाटल्या (एकूण २,५९० रुपये) जप्त करण्यात आल्या.
२८ ऑगस्ट रोजी धनगरवाडी (आगळगाव) येथे शाळुबाई शिवाजी चव्हाण (वय ५०) आणि यंगु लक्ष्मण पवार (वय ६५) या दोघांकडून प्रत्येकी ९ लिटर हातभट्टीची देशी दारू (प्रत्येकी ९०० रुपये) जप्त करण्यात आली.
सर्व प्रकरणांत आरोपींनी परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने अवैध दारू कब्जात ठेवल्याचे आढळून आले. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी छापे टाकून कारवाई केली. सपोनि सोनवने यांच्या आदेशाने पुढील तपास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला असून सर्व प्रकरणांचे अहवाल संबंधित न्यायालयात पाठवण्यात येणार आहेत.
बार्शी तालुका पोलीस ठाणे अवैध दारूविक्री रोखण्यासाठी कारवाई सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या