**बीडमध्ये FDA चा दणका: १ कोटी ९४ लाखांचे १ लाख १९ हजार किलो खाद्यतेल जप्त, पाच आस्थापने सील!**

**बीडमध्ये FDA चा दणका: १ कोटी ९४ लाखांचे १ लाख १९ हजार किलो खाद्यतेल जप्त, पाच आस्थापने सील!** 

KDM NEWS प्रतिनिधी बीड, ९ #ऑगस्ट : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत बीड जिल्ह्यात ६ आणि ७ #ऑगस्ट रोजी खाद्यतेल रिपॅकिंग व सैल तेल साठवणुकीच्या आस्थापनांवर धडक कारवाई केली. यात एकूण १,१९,१८७.५ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. या #साठ्याची किंमत ₹१ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ आहे. पाचही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करून त्यांची कामकाजाची ठिकाणे बंद करण्यात आली.

कारवाई संयुक्त आयुक्त श्रीकांत कारकाळे आणि बीडचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या देखरेखीखाली झाली. तपासणीत मुख्यतः एकाच टाकीतील तेलाला ‘रिफाइंड’ आणि ‘अल्ट्रा रिफाइंड’ अशी वेगवेगळी नावे देणे, वापरलेले टिन पुन्हा वापरणे, अस्वच्छ साठवणूक, इन-हाऊस प्रयोगशाळा नसणे, विश्लेषण प्रमाणपत्रे (Certificate of Analysis), फूड ग्रेड प्रमाणपत्रे, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि कीटक नियंत्रण नोंदी नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या. एकूण २७ नमुने प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

**कारवाई झालेली आस्थापने व जप्त साठा :**

- **स्वागत ऑईल इंडस्ट्रीज** (प्लॉट क्र. ८३, एमआयडीसी, बीड) – ६६,६५२.६ किलो तेल, किंमत सुमारे ₹१.०५ कोटी. एकाच टाकीतील सोयाबीन तेल ‘स्वागत गोल्ड’, ‘गुडलक’ आणि ‘स्वस्तिक गोल्ड अल्ट्रा’ या नावांनी विकले जात होते.
- **चर्खा ऑईल मिल** (प्लॉट क्र. ५२, एमआयडीसी, बीड) – ४५,९९५.७ किलो तेल, किंमत ₹७८.२२ लाख. पाल्मोलिन तेलाला वेगवेगळी लेबले, वापरलेले टिन आणि अस्वच्छ टाक्या. ‘शुभम’, ‘अनुज ड्रॉप’, ‘शुभम अल्ट्रा’ ब्रँडसह खुले सोयाबीन, पाल्मोलिन आणि राईस ब्रान तेल.
- **जय हनुमान ट्रेडर्स** (वडवणी) – ४,५४५.२ किलो तेल, किंमत ₹७.२५ लाख. वापरलेले टिन, अस्वच्छ परिसर आणि लेबलिंग नसलेल्या टाक्या. ‘सोहम’ ब्रँडचे तेल.
- **जान्हवी कमर्शियल्स** (जुना मोंढा, माजलगाव) – १,७४६ किलो सैल रिफाइंड सोयाबीन तेल, किंमत ₹२.७९ लाख. लेबल आणि बॅच नंबर नसलेले तेल असुरक्षित पद्धतीने साठवलेले.
- **विनायक ऑईल इंडस्ट्रीज** (जुना मोंढा, माजलगाव) – २४८ किलो सैल तेल, किंमत ₹३९,६८०. वापरलेले टिन आणि आवश्यक नोंदींचा अभाव.

एफडीएने नागरिकांना सल्ला दिला आहे की, खाद्यतेल खरेदी करताना FSSAI परवाना क्रमांक, उत्पादनाची तारीख, अंतिम वापराची तारीख आणि पॅकेजवरील लेबलिंग काळजीपूर्वक तपासावे. सैल तेल खरेदी टाळावी. प्रशासनाने स्पष्ट केले की, अशा नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरूच राहील.

KDM NEWS प्रतिनिधी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**