*बार्शी पोलिसांची मोठी कारवाई! दीड वर्षांपासून फरारी असलेली महिला आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद*
*बार्शी पोलिसांची मोठी कारवाई! दीड वर्षांपासून फरारी असलेली महिला आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*बार्शी तालुका पोलिसांनी दीड वर्षांपासून फरारी असलेल्या महिला आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुसिंगपुरा येथील डोंगराळ भागातून अटक केली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) अन्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात तक्रारदार मिसाळ यांच्या बॅगेतून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर महिला आरोपीने ठावठिकाणे व मोबाईल क्रमांक वारंवार बदलून पोलिसांना गुंगारा दिला. ती नृत्य कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या भागात फिरत होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाठवण्यात आले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी बहुसिंगपुरा येथील डोंगराळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. डोंगराळ भागातील मोबाईल लोकेशन अडचणींमुळे पथकाने दीड दिवस शेतकरी व कामगार यांच्या वेशभूषेत परिसरात फिरून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि योग्य संधी साधून तिला अटक केली.
आरोपीचे नाव राणी अरुण साळवे (भिवसने), वय २६ वर्षे, राहणार बहुसिंगपुरा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. चोरीला गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला आज न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक सिंधुताई देशमुख, अमृत खेडकर, प्रदीप चौधरी, युवराज गायकवाड, ओमप्रकाश दासरे व सिद्धेश्वर लोंढे यांचा सहभाग होता.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या