*सोलापुरात मराठा आंदोलनात 'जीन झेड' पिढीचा ऐतिहासिक सहभाग; जरांगे पाटलांच्या समर्थनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*सोलापुरात मराठा आंदोलनात 'जीन झेड' पिढीचा ऐतिहासिक सहभाग; जरांगे पाटलांच्या समर्थनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन* 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर :** मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शाळकरी मुली आणि जीन झेड पिढीतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. त्यांच्या जोरदार घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. सोलापूरच्या मराठा आंदोलनाच्या इतिहासात जीन झेड विद्यार्थ्यांचा इतक्या थेट स्वरूपात झालेला हा पहिलाच सहभाग असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, हैदराबाद गॅझेटनुसार शासनाने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करून कुणबी दाखले, सारथी संस्थेच्या बंद योजना तातडीने सुरू करणे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देऊन मराठा तरुणांसाठी उद्योग-व्यवसायाकरिता आर्थिक मदत सुरळीत करणे या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. निवेदनातून शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी आणि जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास मराठा समाज अधिक तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला. शासनाच्या भूमिकेमुळे समाजात अस्वस्थता आणि नाराजी वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले.

निवेदन देतेवेळी शाळकरी मुलींसह माऊली पवार, ज्ञानेश्वर सपाटे, शिवाजी चापले, शिवाजी भोसले, मारुती सावंत, सुनील शेळके, दिनेश डोंगरे, सचिन तिकटे, अशोक भोसले, चंद्रकांत पात्रे, तानाजी माने, राहुल मन्नापुरे, रोहन हावळे, किरण देशमुख, सुरेश जगताप, जनार्दन चव्हाण आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी शाळकरी मुलींना निवेदन दिल्यानंतर स्वतः उठून उभे राहून संवाद साधला. त्यांनी मुलींना “मी जिल्हाधिकारी या नात्याने तुम्हाला आणखी काय मदत करू शकतो” असे विचारले तसेच भविष्यात काय बनायला आवडेल आणि त्यांची स्वप्ने काय आहेत याबद्दल विचारणा केली. मुलींनी खाकी वर्दी, नौदल, आर्मी किंवा डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील संवादामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**