*'डोळ्यांदेखत पीक जळालं...'; पावसाअभावी सोयाबीन शेळ्यांच्या चर्रणात, बार्शी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी*
*'डोळ्यांदेखत पीक जळालं...'; पावसाअभावी सोयाबीन शेळ्यांच्या चर्रणात, बार्शी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. अल्पभूधारक शेतकरी जयदेव सुखदेव शिंदे (वय ६७) गोरमाळे यांनी आपल्या शेतातील करपून वाळत असलेले उभे सोयाबीन पीक शेळ्यांना चारले. ही घटना परिसरातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता स्पष्ट करते.
शिंदे शेतीसोबत सुमारे २० शेळ्यांचे पालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यंदा २० जूनच्या आसपास सोयाबीनची पेरणी केली. उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही. फुले येण्याच्या टप्प्यात पाण्याची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने पिकाची वाढ खुंटली. बार्शी तालुक्यातील अनेक गावांत सोयाबीन जागेवरच करपून वाळू लागले.
शेतात विहीर नसल्याने बोअरच्या पाण्यावर शेती होते. यंदा बोअरमधील पाणीसाठा अत्यल्प झाल्याने सिंचन शक्य झाले नाही. डोळ्यादेखत पीक वाळताना पाहून शिंदे यांनी ते शेळ्यांना चारण्याचा निर्णय घेतला.
बी-बियाणे, मशागत, पेरणी, खते, औषध फवारणीसह एकरी ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च झाला. पावसाअभावी उत्पादन मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्याने हा खर्च भरून निघणे अशक्य झाले आहे.
शिंदे यांनी शासनाने तातडीने बार्शी तालुक्यासह दुष्काळग्रस्त भागात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.
गोरमाळे येथील ही घटना एकट्या शेतकऱ्याची व्यथा नसून, पावसाअभावी संकटात सापडलेल्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे चित्र आहे. बार्शी तालुक्यात दीर्घकाळ पावसाची उणीव असल्याने सोयाबीनसह इतर खरिपाची पिके करपू लागली असून शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या