*सोलर प्लांट व नदीकाठच्या कॉपर वायर चोरीचे ६ गुन्हे उकल; १४५ किलो वायरसह आरोपी जेरबंद*
*सोलर प्लांट व नदीकाठच्या कॉपर वायर चोरीचे ६ गुन्हे उकल; १४५ किलो वायरसह आरोपी जेरबंद*
KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, १४ सप्टेंबर २०२६
स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणने सोलर प्लांट व नदीकाठच्या इलेक्ट्रिक मोटारींतील कॉपर वायर चोरीचे एकूण सहा गुन्हे उकलले असून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून १४५ किलोग्रॅम वजनाचे कॉपर वायर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १ लाख ८८ हजार ५०० रुपये आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकास या चोऱ्यांचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. पथकाला मौजे रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, समाधान नवनाथ पवार (वय २१, रा. रानमसले) हा त्याच्या साथीदारासह गौडगाव (ता. बार्शी) येथील सोलर प्लांट तसेच उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी (ता. माढा) येथील ठिकाणांहून कॉपर वायर चोरून आणत आहे आणि सध्या गावातील घराजवळ विक्रीसाठी उभा आहे.
बातमीनुसार पोलीस पथक रानमसले येथे पोहोचले. आरोपी घराजवळ उभा असताना त्याला ताब्यात घेतले. घरात झडती घेतली असता प्लास्टिकच्या वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरलेले एकूण आठ तांब्याचे तारांचे पोते सापडले. चौकशीत त्याने कबूल केले की, गेल्या काही महिन्यांपासून तो व त्याचा एक साथीदार रात्रीच्या वेळी सोलर प्लांट व नदीकाठच्या मोटारींतील कॉपर व केबल वायर चोरून आणत असत. नंतर रानात वायर जाळून वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरून ठेवत व विक्री करीत.
आरोपीने दाखविलेल्या ठिकाणांनुसार खालील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत:
- वैराग पोलीस ठाणे : गुन्हा क्र. २४८/२०२६, कलम बीएनएस ३०३(२)
- माढा पोलीस ठाणे : गुन्हा क्र. १२५/२०२६, २११/२०२६, ११८/२०२६, १३९/२०२६, कलम बीएनएस ३०३(२)
- टेंभूर्णी पोलीस ठाणे : गुन्हा क्र. २०७/२०२६, कलम बीएनएस ३०३(२)
आरोपी समाधान पवार याला वैराग पोलीस ठाणे गुन्हा क्र. २४८/२०२६ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, नागेश कोणदे, मोहन मनसावाले तसेच पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल, कपिल काटकर व महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांच्या पथकांनी कामगिरी बजावली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या