*मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; प्रकृती अस्वस्थ असतानाही आंदोलनाचा निर्धार कायम!*
*मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; प्रकृती अस्वस्थ असतानाही आंदोलनाचा निर्धार कायम!*
KDM_NEWS_प्रतिनिधी वडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील आज मंगळवारी मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाले. उपोषणाच्या १८ व्या दिवशीही त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना त्यांनी मुंबईत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला.
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी रणनीती बदलली. केवळ दहा सहकारी आणि दोन रुग्णवाहिकांसह ते निघाले. समाजाने सध्या मुंबईत येऊ नये, योग्य वेळी हाक देईन, असे आवाहन त्यांनी केले. एकजूट कायम ठेवा, शांततेने आंदोलन करा आणि संयम सोडू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी मराठा समाजाकडे केले.
अंतरवाली सराटीतून निघताना औक्षण झाले. गाडीत बसताच जरांगे पाटील भावूक झाले. अवघ्या एक किलोमीटरचे अंतर पार करायला हजारो समर्थक आणि वाहनांच्या रांगेमुळे एक तास लागला. वडीगोद्रीतही मोठी गर्दी जमली होती. परिसरात आंदोलनाचे वातावरण होते.
या दौऱ्यासाठी ६४८ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. अंतरवाली ते शहागड मार्गावर संवेदनशील ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली. पहिला मुक्काम पाटोदा येथे असून त्यानंतर श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली मार्गे मुंबईत पोहोचण्याचा कार्यक्रम आहे. १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचा त्यांचा मनोदय आहे.
हे त्यांचे ११ वे उपोषण असून मुंबईकडे जाण्याची ही तिसरी वेळ आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारशी थेट लढाई करण्याचा त्यांचा निर्धार स्पष्ट झाला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या