*बार्शीत सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ; १,५०० विद्यार्थ्यांचा सहभाग*
*बार्शीत सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ; १,५०० विद्यार्थ्यांचा सहभाग*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २८ सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२व्या युवा महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ सोमवारी येथील शिवाजी महाविद्यालयात झाला. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ५५ महाविद्यालयांतील सुमारे १,५०० विद्यार्थी या चार दिवसांच्या कलामहोत्सवात सहभागी झाले आहेत. महोत्सव १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, “युवा महोत्सव केवळ कलाविष्कार नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि भविष्याचे समर्थ नागरिक तयार करण्याची प्रक्रिया आहे. यातून उत्तम कलावंत घडण्याबरोबरच बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वगुणसंपन्न, ऊर्जावान आणि जबाबदार युवक घडावेत.” आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्र व्यापले असताना युवकांनी त्याचा सकारात्मक-सर्जनशील वापर करावा आणि कला, कौशल्ये व मानवी मूल्यांचे जतन करावे, असे त्यांनी सांगितले. केवळ तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यापीठाने महोत्सवासाठी निधी वाढवला असून विद्यार्थी कलावंतांसाठी स्वतंत्र ललित कला संकुलाची इमारत उभारण्यात येत असल्याची माहितीही कुलगुरूंनी दिली. विद्यार्थ्यांनी या चार दिवसांचा मनमुराद आनंद घ्यावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “विद्यार्थिदशेत शिक्षणासोबत अंगभूत कलागुणांचा शोध आणि जोपासना आवश्यक आहे. ग्रामीण व जिल्ह्यातील प्रतिभावंतांना कलेची ओळख निर्माण करून मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची संधी युवा महोत्सव देतो. उत्तम कलावंत घडविण्याची क्षमता यात आहे.”
या महोत्सवात नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य आणि इतर एकूण ३९ कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. रविकांत शिंदे व प्रा. मंजुषा श्रीमंगल यांनी केले. प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी आभार मानले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या