*बार्शीत रेशन तांदळाच्या काळ्या बाजारातील फरार आरोपींना अटक; चार दिवसांची पोलीस कस्टडी*
*बार्शीत रेशन तांदळाच्या काळ्या बाजारातील फरार आरोपींना अटक; चार दिवसांची पोलीस कस्टडी*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १३ सप्टेंबर : गोरगरिबांच्या हक्काचे रेशन अन्नधान्य, विशेषतः तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रकरणात दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकांनी शिताफीने अटक केली आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अंतर्गत तीन आरोपींवर गुन्हा दाखल होता. यातील आरोपी दिगंबर उर्फ आप्पा संभाजी सुरवसे आणि विवेक उर्फ भगवान संभाजी सुरवसे राहणार बार्शी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने रद्द केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली.
दोघांनी सातपेक्षा अधिक मोबाईल क्रमांक बदलून वेशभूषा बदलून विविध जिल्ह्यांत लपून राहण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक विश्लेषणातून ते बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत असल्याचे समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पथकासह सापळा रचला. पळून जाण्याच्या तयारीत असताना दोघांना अटक करण्यात आली.
दोघांना न्यायालयीन हजेरीसाठी हजर केले असता माननीय न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बाबासाहेब हांडे, प्रदीप जगताप, सिद्धेश्वर लोंढे, गोविंद बचुटे, आकाश कांबळे तसेच सोलापूर ग्रामीण सायबर विभागातील राहुल सोनकर आणि विश्वनाथ वस्त्रद यांनी केली.
रेशन व्यवस्थेतील काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या