*पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: आचारसंहिता लागू, राजकीय पक्षांची बैठक*

*पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: आचारसंहिता लागू, राजकीय पक्षांची बैठक* 

*KDM NEWS प्रतिनिधी पुणे, २३ सप्टेंबर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी (२२ सप्टेंबर) जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक झाली.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील पक्ष प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेले. पाचही जिल्ह्यांतील जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका अधिकारीही उपस्थित होते.

**आचारसंहितेचे पालन आवश्यक**  
विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले की, सार्वत्रिक वा पोटनिवडणुकांसाठीच्या आचारसंहिताविषयक तरतुदी या निवडणुकीसाठीही लागू आहेत. मार्गदर्शक पुस्तिका जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तसेच आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. विभागातील सर्व जिल्हाधिकारी त्या-त्या जिल्ह्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतील.

**मतदार नोंदणीची संधी**  
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल करता येतील. सर्वसाधारणपणे २६ सप्टेंबरपर्यंत ही संधी आहे. अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. यादी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.

जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. त्यानंतर आणि २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या नोंदणीनुसार संख्या बदलू शकते. अद्ययावत आकड्यानुसार सुमारे ३.११ लाख पदवीधर आणि ५२ हजार शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे.

**मतदान पद्धत**  
मतदान मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून होईल. निवडणूक प्रशासन याबाबत जनजागृती करत आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन, छाननी आणि निवडणूक खर्चावरील मर्यादा याबाबत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

**निवडणूक कार्यक्रम**  
- अधिसूचना : २९ सप्टेंबर २०२६  
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर  
- अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर  
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर  
- मतदान : २३ ऑक्टोबर, सकाळी ८ ते सायंकाळी ४  
- मतमोजणी : २७ ऑक्टोबर  
- प्रक्रिया पूर्ण : ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी  

विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. या निवडणुकीत पुणे विभाग पदवीधर (विद्यमान : अरुण लाड) आणि पुणे विभाग शिक्षक (विद्यमान : जयंत आसगावकर) या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे समाविष्ट आहेत.

बैठकीत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन विभागीय आयुक्तांनी केले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**