*"नोकरी करायची तर चार लाख आणा"; बार्शीतील तरुणीचा सासरच्यांकडून छळ, व्हॉट्सअॅपवरूनही जीवे मारण्याची धमकी*
*"नोकरी करायची तर चार लाख आणा"; बार्शीतील तरुणीचा सासरच्यांकडून छळ, व्हॉट्सअॅपवरूनही जीवे मारण्याची धमकी*
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका तरुणीने सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी रूतुजा स्वप्निल मेहेर (माहेरचे नाव रूतुजा राजेंद्र काळे, वय २५, बार्शी हिने गुरुवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब दिला.
रूतुजाचे लग्न दि. २४ मे २०२५ रोजी भगवंत मंगल कार्यालय, बार्शी येथे स्वप्निल कैलास मेहेर यांच्याशी झाले होते. लग्नापूर्वी पतीने तिला नोकरी करण्याची व पुणे येथे राहण्याची संमती दिली होती. लग्नानंतर दोघे कुर्डवाडी येथे रूममध्ये राहत होते.
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सुमारे १० वाजता रूतुजाने खाजगी नोकरी करायची इच्छा व्यक्त केली. त्यावर पतीने तिला हाताने मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. काही दिवसांनी रोपळे येथे गेल्यावर रूतुजाने सासू-सासऱ्यांना ही बाब सांगितली. मात्र सासू-सासऱ्यांनी “माझा मुलगा तुला नोकरी करू नको म्हणत आहे, तेच बरोबर आहे” असे सांगून तिलाही शिवीगाळ व दमदाटी केली. दिर संदीप कैलास मेहेरनेही “घरातील मोठी माणसे जे सांगत आहेत ते कळत नाही का” असे म्हणत शिवीगाळ केली. तरीही रूतुजा सहन करत राहिली.
दि. २० मार्च २०२६ रोजी सासरे कैलास मधुकर मेहेर यांना विश्वासात घेऊन नोकरीबाबत बोलले असता त्यांनी “नोकरी करायची असेल तर माहेराहून चार लाख रुपये बांधकामासाठी आण” अशी अट घातली. यापूर्वी दि. ११ मार्च २०२६ रोजी नोकरीच्या वादातून पतीने पुन्हा मारहाण केल्याने रूतुजा माहेरी परतली होती.
दि. ३० जून २०२६ रोजी पतीने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून “एकाएकाला आयुष्यातून संपवले नाही तर बापाचे नाव सांगणार नाही” तसेच “तुझे तुझ्या भावासोबत संबंध आहेत” असा आरोप करत धमकी दिली.
लग्नापूर्वी दिलेल्या आश्वासनांविरुद्ध सासरच्यांकडून सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याने तिची तक्रार आहे, असे रूतुजाने जबाबात म्हटले आहे. पोलिस तक्रारीची चौकशी करीत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या