*संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर*

*संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर* 

*KDM NEWS प्रतिनिधी पुणे : सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संतोष गजानन पंडित  नारायण पेठ यांना अखेर पुणे सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे.

कोथरूड पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३६१/२०२६ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी बुधवार (१६ सप्टेंबर) रोजी जामीन अर्ज क्रमांक ४८८८/२०२६ मंजूर केला. पंडित यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर व तितक्याच रकमेच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली.

**न्यायालयाच्या अटी**  
फिर्यादीशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये. अभियोजन पुराव्यात हस्तक्षेप करू नये.

**प्रकरणाची पार्श्वभूमी**  
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पंडित यांनी युट्युब व सोशल मीडियावर अपलोड केलेल्या रील्स-व्हिडिओंमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, एक महिला पुणे महानगरपालिका नगरसेविका आणि काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, लैंगिक रंग असलेली व अवमानकारक विधाने केल्याचा आरोप आहे. ३६ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(१)(iv), ७५(३), ३५६(२), ३५२ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. पंडित यांना ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घरातून अटक करण्यात आली. प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

**न्यायालयाचे निरीक्षण**  
या गुन्ह्यांसाठी कमाल शिक्षा तीन वर्षे आहे. तपासासाठी आवश्यक पुरावे अटक न ठेवताही गोळा करता येतात. साक्षीदारांवर दबाव किंवा पुन्हा अशी कृत्ये होण्याची शक्यता केवळ अनुमानित असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

पंडित यांना या आदेशानुसार सुटका करण्यात येणार आहे. प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**