*बार्शी तालुक्यात सोयाबीनसह खरीप पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकरी संकटात*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दांडी मारल्याने सोयाबीन, उडीद, मूग आणि मका यांसारखी खरीप पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. जुलै-ऑगस्टच्या महत्त्वाच्या कालावधीत थेंबभर पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
#बार्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. पिके फुलोऱ्यात आणि वाढीच्या टप्प्यात असतानाच जमिनीतील ओलावा संपला. सोयाबीनची पाने वाळू लागली असून, जमिनीला भेगा पडलेल्या दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी वाया गेलेल्या सोयाबीन,उडीद पिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट केले आहे. एका शेतकऱ्याने सांगितले की, ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पुन्हा थेंबही पडला नाही, त्यामुळे पीक सुकले.
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बियाणे, खते, कोळपणी-उपणी यांचा खर्च आधीच वाढला आहे. त्यात पावसाअभावी उत्पादनात मोठी घट किंवा पूर्ण नुकसान होण्याची भीती आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीची गरज भासण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक आणि शेतीचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी राज्य सरकारकडे तातडीची मागणी करत आहेत. प्रशासनाने पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि दुष्काळ जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. जोरदार पाऊस पडला तर सुकणाऱ्या पिकांना दिलासा मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या