*प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश व्हावा; मतदार यादी शुद्धीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*
*प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश व्हावा; मतदार यादी शुद्धीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*
KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये सुरू केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे शुद्धीकरण सुरू आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश करणे आणि अपात्र नागरिकांना वगळणे हा याचा उद्देश आहे. सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, नोडल अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, “राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल असिस्टंट बूथ लेव्हल ऑफिसरना मदत करत आहेत. ज्यांची नावे सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाहीत, अशा लोकांचे गठ्ठ्याने अर्ज आणू नयेत. असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एसआयआरचा हेतू मतदारांना वगळणे नसून याद्या शुद्ध करणे आहे. एकही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही. दावे व हरकती दाखल करताना पुरावे सादर करावेत.”
निवडणूक आयोगाने त्यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून सोलापूर जिल्ह्यात तीन वेळा भेटी होतील. पक्षांनी अडचणी वेळोवेळी मांडाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी माहिती दिली की, १७ जून २०२६ रोजी जिल्ह्यात एकूण ३९ लाख ४१ हजार ९५ मतदार होते. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध प्रारूप यादीत ही संख्या ३३ लाख १८ हजार ४२४ झाली. एएसडीडी यादीत ६ लाख २२ हजार ६७१ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात पूर्वी ३ हजार ७२३ मतदान केंद्रे होती. त्यात १७ नवीन केंद्रे वाढून आता एकूण ३ हजार ७४० मतदान केंद्रे झाली आहेत. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
बैठकीत पक्ष प्रतिनिधींनी अनुपस्थित व स्थलांतरित मतदारांचा समावेश कसा करायचा, एकाच कुटुंबातील सदस्यांचे मतदान एकाच केंद्रावर राहावे आणि पात्र मतदार वगळले जाऊ नयेत, याबाबत सूचना दिल्या. पक्ष आणि त्यांचे बूथ लेव्हल असिस्टंट प्रशासनाला सहकार्य सुरू ठेवतील, असेही त्यांनी सांगितले.
**सुधारित वेळापत्रक**
घरभेटी : ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६
मतदान केंद्र सुसूत्रीकरण : २४ ऑगस्ट २०२६
प्रारूप मतदार यादी : ३१ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती : ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत
सुनावणी : २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत
अंतिम मतदार यादी : ४ नोव्हेंबर २०२६
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या