*बनावट औषधांवर कडक नजर; राज्यात काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइसने विशेष तपासणी मोहीम*
*बनावट औषधांवर कडक नजर; राज्यात काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइसने विशेष तपासणी मोहीम*
*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई: राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’चा प्रभावी वापर करण्याचे आणि प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) अवलंबून नियमित औषध तपासणी करण्याचे निर्देश दिले.
राज्यातील आठ परिमंडळांसाठी प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना उपकरण हाताळणीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. प्रत्येक परिमंडळातील जिल्ह्यांसाठी औषध तपासणीचे वेळापत्रक निश्चित करून क्षेत्रीय तपासणी होणार आहे. तपासणीची कार्यवाही, अनुपालन, तपासलेल्या औषधांची संख्या आणि सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
**विशेष मोहीम एक महिना**
आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नव्याने प्राप्त औषधांसह उपलब्ध औषधसाठ्यातील नमुने यादृच्छिक पद्धतीने तपासण्यात येतील. तपासणीसाठी संबंधित प्राधिकरण, रुग्णालय व खरेदी यंत्रणेची संयुक्त पथके कार्यरत राहणार आहेत. कर्मचाऱ्यांना उपकरण हाताळणी, नमुना तपासणी व निकाल विश्लेषणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’च्या प्रभावी वापरातून औषध गुणवत्ता तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करून गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ही उपकरणे जागेवरच औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी उपयुक्त ठरणार असून प्रयोगशाळेतील विलंब टाळून तातडीने कारवाई शक्य होईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या