*सोलापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डिजिटल क्रॉप सर्व्हे केला*

**सोलापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डिजिटल क्रॉप सर्व्हे केला** 

KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. १२ (जिमाका) : पावसातील प्रदीर्घ खंड आणि कमी पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी व धोत्री तसेच अक्कलकोट तालुक्यातील वळसंग, कोण्हाळी, कुरनूर, कुरनूर धरण परिसर आणि नाविंदगी या गावांना भेट दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रतापनगर व भाटेवाडी येथेही त्यांनी पिकांची पाहणी केली. सोयाबीन, ऊस, मका, तूर, उडीद आणि कागदी लिंबू या पिकांची स्थिती समजून घेतली. शेतकऱ्यांकडून पेरणीची तारीख, शेवटचा पाऊस, पावसाचा खंड आणि जमिनीतील ओलावा याबाबत माहिती घेतली. अनेक ठिकाणी जून-जुलैमध्ये पेरणी झालेल्या पिकांची वाढ थांबली असून काही पिके कोमेजून जळाली आहेत. उसाची वाढही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. कागदी लिंबू फुलावर असताना पाऊस नसल्याने फुले लागलेली नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी पावसाअभावी उडीद-तूर पिके काढून टाकल्याचेही निदर्शनास आले. उसासाठी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली.

भाटेवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डिजिटल क्रॉप सर्व्हे केला. पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि जनावरांसाठी चारा-पाणी उपलब्धतेबाबतही त्यांनी चौकशी केली. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ पाहणी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांची पाहणी १२ आणि १३ सप्टेंबर या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी तीन तालुक्यांची, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी माळशिरस व सांगोला या दोन तालुक्यांची पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी १३ सप्टेंबर रोजी चार तालुक्यांची पाहणी करणार आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल संकलित करून दुष्काळ परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला तातडीने सादर केला जाईल.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले की, शासनाच्या निकषांनुसार कमी पाऊस आणि पावसातील खंड हे दुष्काळाचे महत्त्वाचे ट्रिगर आहेत. सध्या माळशिरस, सांगोला, मोहोळ आणि बार्शी या चार तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचे बारकाईने मूल्यांकन सुरू आहे. जिल्ह्यात सध्या ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, गरज भासल्यास ही संख्या वाढविण्यात येईल.

उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले आहे. अतिरिक्त पाण्याच्या विसर्गातून जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के लघु पाणी प्रकल्प भरून घेण्यात आले आहेत. उपलब्ध जलसाठ्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन सुरू आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळ परिस्थितीची तातडीने पाहणी करून अहवाल शासनाला पाठवावा आणि निकषांनुसार शेतकऱ्यांना लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने, दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे, अक्कलकोट तहसीलदार विनायक नगर, उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरूळे व अवधूत मुळे यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन दुष्काळसदृश परिस्थितीची संपूर्ण पाहणी पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करेल. शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**