**विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी समिती गठित; डॉ. सुहास पेडणेकर अध्यक्ष**
*विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी समिती गठित; डॉ. सुहास पेडणेकर अध्यक्ष*
KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठीच्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी समिती गठित करण्यात आली आहे. ही माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध विद्यापीठे व महाविद्यालयांतील तज्ज्ञांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे हे सदस्य सचिव आहेत.
समितीच्या जबाबदाऱ्यांमध्ये अधिनियमाचा व एकरूप परिनियमांचा सविस्तर अभ्यास, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक, सुलभ आणि गतिमान करण्यासाठी मार्गदर्शक सूचना सुचविणे, विविध घटकांसाठी योग्य नियमावली निश्चित करणे आणि पुढील दिशा ठरविणे यांचा समावेश आहे. समिती शासनाला आवश्यक उपाययोजना व शिफारशी सादर करेल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या