*बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; चारा छावण्या व तातडीची मदत सुरू करा : शिवसेनेची मागणी*

*बार्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; चारा छावण्या व तातडीची मदत सुरू करा : शिवसेनेची मागणी* 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर : बार्शी तालुक्यात जून ते सप्टेंबरमध्ये सुमारे ५० ते ६० दिवस सलग पावसाचा खंड पडल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख व बार्शी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी पांडुरंग (नाना) त्रिंबक पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर झाले. त्यात म्हटले आहे की, जूनमध्ये अत्यल्प पाऊस झाला आणि त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाने दांडी मारल्याने खरिपाच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली; मात्र पाऊस नसल्याने सोयाबीन, ऊस, कांदा, फळबागा आणि इतर पिके पूर्णतः करपली आहेत. शेतीची कामे थांबली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अनेक गावांमध्ये विहिरी, बोअरवेल्स आणि इतर जलस्रोतांची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या मागण्यांमध्ये मुख्यतः पुढील मुद्दे समाविष्ट आहेत –  
• तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे  
• शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना वेळेवर लाभ देणे  
• तालुक्यातील सर्व शैक्षणिक फी माफ करणे  
• नदी-ओढ्यांचे मंदीकरण व खोलीकरण करणे  
• रोहयो योजनेतून ओढे, नाले, शेततळे आदी कामे राबवून रोजगार उपलब्ध करणे  
• कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवणे  
• शेती पिकांचे पंचनामे तात्काळ करून मदत देणे  

निवेदनात तहसीलदारांना विनंती करण्यात आली आहे की, बार्शी तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकरी तसेच मजूर यांना योग्य न्याय मिळवून द्यावा. पांडुरंग पाटील यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून सोलापूरसह १८-१९ जिल्हे दुष्काळसदृश परिस्थितीत असल्याचे अहवाल आहेत. शासन पातळीवर पंचनामे व मदतीबाबत चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर अशा मागण्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संकटाला अधिक तीव्रता मिळाली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**