*सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय गौरव! आपत्ती व्यवस्थापन विभागाला सहा 'सेफ-टेक' पुरस्कार प्रदान*
*सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय गौरव! आपत्ती व्यवस्थापन विभागाला सहा 'सेफ-टेक' पुरस्कार प्रदान*
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, ७ सप्टेंबर : सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. मुंबईत झालेल्या सहाव्या सेफ-टेक पुरस्कार, परिषद व प्रदर्शन २०२६ मध्ये जिल्ह्याला एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
किंग्ज एक्सप्लो मीडिया यांच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ताज येथे हा सोहळा पार पडला. देशभरातील सुरक्षा, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आणि बचावक्षेत्रातील १३५ अधिकारी, व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांना ‘बेस्ट ऑफिसर’ विभागात ‘बेस्ट फायर फायटर अँड रेस्क्युअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपत्तीकाळात तत्पर कार्यवाही, बचावकार्याचे प्रभावी नियोजन आणि विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये दाखवलेल्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल (डीआरएफ) मधील बजरंग होटकर, रामचंद्र वाघमारे, सागर धप्पाधुळे, शुभांगी गवते आणि अरुणा राठोड या पाच जवानांना ‘फर्स्ट रिस्पॉन्डर अँड रेस्क्युअर’ विभागात ‘बेस्ट फायर फायटर अँड रेस्क्युअर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पूरपरिस्थितीतील बचाव, आगप्रतिबंधक उपाय, आपत्कालीन बचावकार्य आणि गर्दी नियंत्रणातील त्यांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी अधिकारी व डीआरएफ जवानांचे अभिनंदन केले. आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दाखवलेल्या तत्परता, धैर्य आणि सेवाभावाची राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या सहा पुरस्कारांमुळे सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची कार्यक्षमता आणि बचाव पथकाचे सेवाभावी कार्य देशपातळीवर अधोरेखित झाले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या