*बार्शीत गोकुळाष्टमी उत्साहात; दैवी गुणांसाठी राजयोगाचा संदेश*

*बार्शीत गोकुळाष्टमी उत्साहात; दैवी गुणांसाठी राजयोगाचा संदेश* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या स्थानिक सेवाकेंद्रावर आयोजित गोकुळाष्टमी कार्यक्रमात ब्रह्माकुमारी निशादिदी यांनी श्रीकृष्णाप्रमाणे दैवी गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी संगीतादिदी होत्या.

निशादिदी म्हणाल्या, श्रीकृष्ण सत्ययुगातील सर्वगुणसंपन्न महाराजकुमार होते. आज परमपिता परमात्मा शिव ज्ञानमुरलीद्वारे मार्गदर्शन करीत असून राजयोगाने बुद्धी, दिव्य गुण आणि संस्कारांचा आंतरिक शृंगार होतो. बाह्य शृंगार विनाशी, तर आंतरिक शृंगार अविनाशी आहे. मुलांना श्रीकृष्णाप्रमाणे वस्त्रे घालून सजवणे आनंद देते, पण खरे सौंदर्य पवित्रता, प्रेम, शांती, सत्यता, निर्भयता, प्रसन्नता आणि करुणा या गुणांमध्ये आहे. हे गुण राजयोगाच्या नियमित अभ्यासातून परमात्म्याशी संबंध जोडून विकसित होतात. त्यामुळे नकारात्मक विचार कमी होऊन आत्मिक शक्ती वाढते.

आपत्ती, हिंसाचार आणि अशांतीच्या काळात राजयोग ध्यानाद्वारे शांती-शक्तीच्या प्रकंपना पसरवून दुःखी आत्म्यांना आधार देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येकाने दैवी गुण वाढवल्यास कुटुंब, समाज आणि विश्वात शांती निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. संस्था येथे साप्ताहिक अभ्यासक्रम पूर्ण करून जीवन दैवी गुणसंपन्न बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

संगीतादिदी म्हणाल्या, श्रीकृष्ण-गोपिकांच्या रासलीलेतून विचार, स्वभाव आणि संस्कारांच्या मिलनाचा संदेश मिळतो. राजयोगाने ही मिलन सहज शक्य होते.

कार्यक्रमात पाचवीच्या अद्विका बारंगुळे व आराध्या जगदाळे यांनी गोपिका वेशात, चौथीच्या लेखराज शिंदे याने श्रीकृष्ण वेशात नृत्य सादर केले. दोन वर्षांच्या गुंजन मोरे हिनेही उत्स्फूर्त सहभाग घेतला. समारोपानंतर उपस्थितांनी रासलीलाचा आनंद घेतला.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**