*बार्शीत रंगणार विद्यापीठाचा २२ वा युवा महोत्सव; २८ सप्टेंबरपासून चार दिवस कलाकुंभ*

*बार्शीत रंगणार विद्यापीठाचा २२ वा युवा महोत्सव; २८ सप्टेंबरपासून चार दिवस कलाकुंभ* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २३ सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचे यजमानपद यंदा श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीला मिळाले आहे. दि. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महाविद्यालय परिसरात हा चार दिवसीय कलामहोत्सव संपन्न होणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगमंचावर होईल. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर असतील. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल, आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. वी. वाय. यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाशी संलग्न सुमारे ११० महाविद्यालयांचे १५०० ते २००० विद्यार्थी ३९ कलाप्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. संगीत, नाट्य, नृत्य, ललित कला आणि साहित्य या क्षेत्रांतील विविध स्पर्धा महाविद्यालय परिसरात उभारलेल्या नऊ स्वतंत्र रंगमंचांवर एकाच वेळी चालतील. १४ वर्षांनंतर बार्शीला पुन्हा यजमानपद मिळाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयाची तयारी अंतिम टप्प्यात असून कलाकारांमध्ये जोरदार सराव सुरू आहे.

समारोप समारंभ दि. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर असतील. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे, संचालक डॉ. केदारनाथ काळवणे तसेच विद्यापीठाचे अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद सदस्य आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**