*महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज!*

*महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज!* 
*KDM NEWS प्रतिनिधी*ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पिके संकटात सापडली होती. अनेक जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट नोंदवली गेली. अहिल्यानगर आणि बीडसारख्या भागांत तूट ८० टक्क्यांपेक्षाही अधिक होती. या पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोठा दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे.

डख यांच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. १ आणि २ सप्टेंबर तसेच ६, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी सांगली, सोलापूर, सातारा, बारामती, पुणे आणि पंढरपूर परिसरात मध्यम ते चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पेंडवळत्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. या पावसामुळे शेतात पाणी जमा होईल आणि पिकांना दिलासा मिळेल.

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे, घाटमाथा आणि कोकणपट्टीतही याच काळात चांगला पाऊस अपेक्षित आहे. कोल्हापूरपासून पालघरपर्यंतच्या पट्ट्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्ह्यांतही पाऊस हजेरी लावेल. विदर्भात ४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढेल. नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता डख यांनी वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने २ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढेल. ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस अपेक्षित आहे. गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील इतर जिल्हे आणि पुण्याच्या घाट भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी आणि पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करावीत, असा सल्ला देण्यात येत आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**