*नाशिकमध्ये राहुल गांधींकडून जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशीही चर्चा*

*नाशिकमध्ये राहुल गांधींकडून जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशीही चर्चा* 

*KDM NEWS प्रतिनिधी नाशिक : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी सकाळी नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर काँग्रेस नेत्यांनी त्यांचे गुलाबी गुलाब देऊन स्वागत केले.

राहुल गांधी यांचा हा एकदिवसीय दौरा आहे. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर अवघ्या ११ दिवसांत हे त्यांचे महाराष्ट्रातील दुसरे आगमन आहे. त्यांनी थेट गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टकडे कूच केले.

येथे संघटन सृजन अभियानांतर्गत राज्यातील ७८ नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर २४ ऑगस्टपासून सुरू आहे. या शिबिराचा समारोप राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला. ते सुमारे साडेचार ते पाच तास शिबिरस्थळी राहिले. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी त्यांनी थेट संवाद साधला. तसेच ‘जागतिक राजकारण आणि भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिबिरात दिल्लीहून आलेल्या प्रशिक्षकांकडून जपानी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणही दिले गेले होते.

कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज ऊर्फ बंटी पाटील, नसीम खान, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम बंद दाराआड झाला. प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. सुरक्षेसाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेडिंग करण्यात आले होते.

याचवेळी राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशीही चर्चा केली. नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. काहींनी आमरण उपोषणही सुरू ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी मंगळवारीच आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. राहुल गांधी यांच्या कार्यालयातून दुपारी दोनच्या सुमारास भेटीची वेळ निश्चित करण्यात आली होती.

राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही स्वतंत्र चर्चा केली. संध्याकाळी ते दिल्लीला रवाना झाले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**