*बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालयाची १७ व्या वेळी सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर*

*बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालयाची १७ व्या वेळी सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचा सांगता समारंभ गुरुवार (१ ऑक्टोबर) रोजी बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झाला. यजमान महाविद्यालयाने या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपला दबदबा कायम ठेवला. ही या महाविद्यालयाची सलग १७ वी सर्वसाधारण विजेतेपदाची बाजी ठरली.

चार दिवस चाललेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील सुमारे ४५ महाविद्यालयांतील एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी ३९ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला आणि ललित कला अशा विविध गटांमध्ये तीव्र स्पर्धा झाली.

समारोप समारंभाच्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. आमदार दिलीप सोपल, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे आणि प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्रेया बुगडे म्हणाल्या, “मुलींचा ६० टक्के सहभाग ही आनंदाची बाब आहे. युवा महोत्सव ही पायाभरणी आहे. जिंकणे-हारणे यापेक्षा भाग घेणे महत्त्वाचे. मेहनतीला पर्याय नाही. आई-वडिलांचा आशीर्वाद कायम ठेवा आणि त्यांना अभिमान वाटेल असे जगा.”

आमदार दिलीप सोपल यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत “रियाज करा, मग राज करा” असे सांगितले. संस्थेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाचे आणि सहभागी सर्वांचे आभार मानण्यात आले. यावेळी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, संचालक डॉ. काळवणे आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

श्री शिवाजी महाविद्यालयाने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवत सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात आपला ऐतिहासिक दबदबा कायम ठेवला.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**