*महायुतीत राजकीय भूकंपाची शक्यता : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपविरोधात मंगेश चिवटे बंडाच्या पवित्र्यात*
महायुतीत राजकीय भूकंपाची शक्यता : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपविरोधात मंगेश चिवटे बंडाच्या पवित्र्यात
“एकनाथ शिंदेंचाच मला उमेदवारी अर्ज भरण्याचा थेट आदेश” — चिवटेंचा खळबळजनक दावा
KDM NEWS प्रतिनिधी पुणे (विशेष प्रतिनिधी):विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे सांगण्यात येत असतानाच, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात मात्र महायुतीत मोठी राजकीय ठिणगी पडली आहे. भाजपने ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेत परस्पर हालचाली व उमेदवारी निश्चिती सुरू केल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) नेते मंगेश चिवटे यांनी उघड बंडाचे निशाण फडकवले आहे. “पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनीच मला स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत,” असा दावा करत चिवटे यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
भाजपकडून जागेवर दावा, शिवसेनेत असंतोष
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर खलबतं सुरू होती. पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही मित्रपक्षांचा दावा होता. मात्र, अंतर्गत घडामोडींनंतर ही जागा भाजपकडे गेल्याची चर्चा सुरू झाली आणि भाजपकडून कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब मानले जाऊ लागले. भाजपच्या या एकतर्फी भूमिकेमुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मंगेश चिवटे यांचा निवडणूक लढवण्याचा निर्धार
मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळख असलेले मंगेश चिवटे यांनी गेल्या वर्षभरापासून पुणे विभागात शिक्षकांशी थेट संवाद साधत मोठी मोर्चेबांधणी केली आहे.
या राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया देताना मंगेश चिवटे म्हणाले, “पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्ही दीर्घकाळापासून काम करत आहोत. शिक्षक बंधू-भगिनींचा मला प्रचंड पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांनी मला फोनवरून तयारी सुरू ठेवण्याचे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असून निवडणूक लढण्यावर ठाम आहे.”
महायुतीत ‘फ्रेंडली फाईट’ की उघड बंडखोरी?
भाजपने जागा स्वतःकडे खेचल्याने आणि शिवसेनेच्या शिलेदाराने थेट आव्हान दिल्याने महायुतीतील समन्वय पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. वरिष्ठ पातळीवर मंगेश चिवटे यांची समजूत काढून बंड रोखण्यात यश येणार की पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतच ‘मैत्रीपूर्ण लढत’ (फ्रेंडली फाईट) रंगणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या