*पांढरी-पांगरी पाणी वाद मिटला; आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने दोन दिवसांचे उपोषण संपले*
*पांढरी-पांगरी पाणी वाद मिटला; आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने दोन दिवसांचे उपोषण संपले*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सोलापूर, ६ ऑक्टोबर : दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात निर्माण झालेला पाणी वापराचा वाद आमदार राजेंद्र राऊत यांच्या निर्णायक मध्यस्थीने मिटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बार्शी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आज अखेर संपले. पांढरी गावच्या ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते उपोषण सोडले.
मृद व जलसंधारण उपविभाग, मोहोळ यांच्याकडील पत्रानुसार मौजे पांगरी गावासाठी साठवण तलाव पांढरी येथून पाणी उपसा सुरू होता. जल जीवन मिशन अंतर्गत पाथरी मध्यम प्रकल्प तसेच ममदापूर येथील लघु पाणी पुरवठा योजनेतून पांगरीला पर्यायी पाणी पुरवठा उपलब्ध झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पांढरी तलावात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानंतर पांढरी गावातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. मात्र आमदार राजेंद्र राऊत यांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करून मध्यस्थी केली. त्यांनी आठ तास पाणी वापरण्याची व्यावहारिक योजना सुचवली. पांढरी गावाच्या गावकऱ्यांनी ही योजना मान्य केली. त्यामुळे दोन्ही गावांमधील वाद मिटला आणि तहसील कार्यालयासमोरील उपोषणही आज संपले.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्तक्षेपामुळे शांततापूर्ण आणि दोन्ही गावांच्या हिताचे समाधान निघाले, असे स्थानिकांचे मत आहे. त्यांची मध्यस्थी निर्णायक ठरल्याचे सर्वांनी स्वागत केले आहे. दोन्ही गावांतील नागरिकांनी आमदारांच्या या प्रयत्नांचे आभार मानले आहेत.
पाणी ही सर्वांची गरज आहे, हे लक्षात घेऊन संवाद आणि समजूतदारपणातूनच समस्या सोडवता येतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या