*जंतरमंतरकडे जाणाऱ्या विरोधी खासदारांच्या बसेस अडवल्या; प्रियांका गांधी रस्त्यावर झोपल्या, राहुल-प्रियांका ताब्यात*

*जंतरमंतरकडे जाणाऱ्या विरोधी खासदारांच्या बसेस अडवल्या; प्रियांका गांधी रस्त्यावर झोपल्या, राहुल-प्रियांका ताब्यात* 

*KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली:** मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी बुधवारी (७ ऑक्टोबर) दिल्लीत जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांच्या बसेस अडवल्यानंतर रस्त्यावरच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी संविधान पुस्तक हातात घेऊन रस्त्यावर झोपून ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह राहुल गांधी आणि इतर सुमारे ९० खासदार व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या आमंत्रणावरून विरोधी खासदारांनी मध्य दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर तीन बसेस भरून जंतरमंतरकडे कूच केली. पोलिसांनी आशोका रोड-जंपथ चौकाजवळ, शांग्री-ला हॉटेल परिसरात बसेस रोखल्या. पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. यामुळे खासदार बसेस उतरून रस्त्यावर बसले.

प्रियांका गांधी यांनी इतर महिला खासदारांसह रस्त्यावर झोपून विरोध केला. त्यांनी संविधान पुस्तक छातीवर धरले होते. पोलिसांकडून हटविण्याच्या प्रयत्नादरम्यान त्यांनी आरोप केला की, “निवडणूक आयुक्तांना भेटायला जाणाऱ्या खासदारांना पोलिसांनी असे वागवले. आम्हाला मारहाण केली, जमिनीवर फेकले आणि मला पूर्ण शरीराला ओरखडे आले. आम्ही येथून हलणार नाही.”

राहुल गांधी यांना पोलिसांनी खांद्यावर उचलून पोलिस बसमध्ये नेले. काही काँग्रेस नेत्यांनी त्या बसवर चढून विरोध केला. नंतर महिला पोलिसांनी प्रियांका गांधी आणि इतर महिला नेत्यांना जबरदस्तीने बसवर चढवले. राहुल गांधी यांना बाराखंभा रोड पोलीस स्टेशनला तर प्रियांका गांधी यांना छत्रसाल स्टेडियमला नेण्यात आले. रात्री साडेआठच्या सुमारास दोघांची सुटका करण्यात आली.

हे आंदोलन दुसऱ्या दिवशीचे होते. मंगळवारीही आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या देऊन खासदार ताब्यात घेण्यात आले होते. विरोधक मतदार यादीत कथित अनियमितता आणि ‘व्होट चोरी’चा आरोप करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राहुल गांधी यांनी म्हटले की, “ज्ञानेश कुमार राजीनामा देईपर्यंत आंदोलन थांबणार नाही. ही देशातील सर्वात पवित्र गोष्टीची लढाई आहे.”

पोलिसांनी यावेळी सुमारे ९१ नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही कार्यकर्त्यांनी पोलिस बसेसच्या टायर पंक्चर केल्याचाही आरोप आहे. दुसऱ्या दिवशीही या प्रकरणात नवे एफआयआर दाखल झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील राजकीय वातावरण यामुळे तापले असून विरोधक आंदोलन सुरू ठेवण्याच्या तयारीत आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**