**एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ९ परीक्षांची चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदने मागितली**
*एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ९ परीक्षांची चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत निवेदने मागितली*
KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, २९ ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी व गैरप्रकारांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने संबंधित सर्व व्यक्तींना निवेदने सादर करण्याचे आवाहन केले आहे. चौकशी आयोगाचे सदस्य-सचिव तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी जाहीर केले की, १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत निवेदने स्वीकारली जातील.
माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या पाच सदस्यीय आयोगात माजी न्यायमूर्ती पी. डी. नाईक, आयपीएस लखमी गौतम, माजी आयएएस गणेश पाटील आणि सदस्य-सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. आयोगाने २०२३ ते २०२६ दरम्यान झालेल्या एकूण नऊ परीक्षांमधील कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरकुंजी फुटीची चौकशी करणार आहे. यात ड्रग इन्स्पेक्टर गट-ब २०२५, महाराष्ट्र गट-ब (नॉन-गॅझेटेड) सेवा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा २०२५, गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२५, कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४, अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२३, सिव्हिल इंजिनिअरिंग सेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सेवा मुख्य परीक्षा २०२५ यांचा समावेश आहे.
या प्रकरणाशी संबंधित परीक्षार्थी, विद्यार्थी, अन्य व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी मराठी किंवा इंग्रजीत शपथपत्राच्या स्वरूपात निवेदन सादर करावे. वैध ओळखपत्र आणि स्व-साक्षांकित कागदपत्रांच्या प्रती आवश्यक आहेत. निवेदनाची व कागदपत्रांची एक प्रत complaints.inquirycomm.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठवावी. तक्रारींबाबत मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहे. आयोगाचे कार्यालय बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अन्न व औषध प्रशासन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०१ येथे सुरू आहे.
निवेदने गोपनीय ठेवली जातील. आयोग कागदपत्रांची छाननी करून साक्ष देण्यासाठी बोलावण्याबाबत निर्णय घेईल. सुनावणी जाहीरपणे होणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या