*खरीप दुष्काळ २०२६ : बार्शी तालुक्यात अग्रीम मदत वाटपाची सुरुवात; राज्यातील पहिला लाभार्थी तांदळवाडीत*

*खरीप दुष्काळ २०२६ : बार्शी तालुक्यात अग्रीम मदत वाटपाची सुरुवात; राज्यातील पहिला लाभार्थी तांदळवाडीत* 
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ₹५,००० अग्रीम मदतीच्या वाटपाला बार्शी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली आहे. तांदळवाडी गावात दहा खातेदारांना मदत वितरित करण्यात आली असून, या माध्यमातून राज्यातील पहिला लाभार्थी बार्शी तालुक्यातील ठरला आहे.

राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान झालेल्या सुमारे दीड कोटी नोंदणीकृत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट डीबीटीद्वारे ही मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. एकूण ₹७,५०० कोटींच्या या योजनेसाठी शासनाने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, याद्या तयार करणे व लाभार्थी माहिती अद्ययावत करण्याची सुविधा तहसीलदारांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे.

बार्शी तालुक्यात तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महसूल सहाय्यक संदीप नालपे यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया अचूकपणे राबविण्यात येत आहे. गावनिहाय नियंत्रण अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या मदतीने लाभार्थी माहिती संकलन, पोर्टलवर यादी तयार करणे व पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दिवाळीपूर्वी तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रशासन कटिबद्ध आहे. बार्शी तालुक्याने राज्यातील अग्रीम मदत वाटप प्रक्रियेत आघाडी घेत महसूल व कृषी विभागाच्या समन्वयाचे उदाहरण निर्माण केले आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**