*बार्शी तहसील कार्यालयात सुनावणीदरम्यान राडा; उपविभागीय अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल*
*बार्शी तहसील कार्यालयात सुनावणीदरम्यान राडा; उपविभागीय अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी, जि. सोलापूर : तहसील कार्यालयातील अर्धन्यायिक सुनावणीदरम्यान गोंधळ घालून उपविभागीय अधिकाऱ्याला धमकावल्याच्या आरोपावरून घाणेगाव (ता. बार्शी) येथील सोमनाथ गिरी याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२ अन्वये शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकी देणे किंवा बळाचा वापर करणे यासाठी एफआयआर क्र. ०७५५/२०२६ हा १ ऑक्टोबर रात्री १२.४६ वाजता नोंदवण्यात आला.
बुधवार (३० सप्टेंबर) दुपारी ३ वाजल्यापासून तहसीलदाराच्या दालनात उपविभागीय अधिकारी (सोलापूर क्र. १) सदाशिव पडदुणे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. बोर्डवर १०३ प्रकरणे होती. दालनात १० ते १५ वकील व पक्षकार उपस्थित होते. दुपारी सुमारे ४.५३ वाजता अनुक्रमांक ९९ वरील आरटीएस केस क्र. ४९५/२०२६ (वादी धनराज गरड, प्रतिवादी रामहरी गिरी) पुकारण्यात आली. त्यावेळी प्रतिवादीतर्फे आलेल्या व्यक्तीने स्वतःला वकील असल्याचे सांगून मोठ्याने आरडाओरड सुरू केली.
त्याने “नोटीस न देता स्थगिती कशी दिली”, “वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावाखाली बेकायदेशीर आदेश दिला” असे आरोप केले. तसेच “तुमचे सर्व सीडीआर काढतो, ठिकठिकाणी तक्रारी करून चौकशा लावतो, स्वस्थ जगू देणार नाही” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत आहे. या गोंधळामुळे सुमारे एक तास कामकाज ठप्प झाले. त्याने स्वतःचे नाव सोमनाथ गिरी, रा. घाणेगाव असे सांगितले. मात्र प्रतिवादीतर्फे हजर राहण्यासाठी त्याच्याकडे वकीलपत्र किंवा कुलमुखत्यारपत्र नव्हते.
वादाचे मूळ गट नं. २४८/१ वरील फेरफार क्र. ३१२० मध्ये आहे. खरेदीखत क्र. २८५/२०२६ हे २५ लाख रुपयांच्या चेकद्वारे झाले होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वैराग शाखेचे दोन्ही चेक न वटल्याचे पुरावे वादीच्या वकिलांनी सादर केले. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम २५६ नुसार पुढील फेरफारांना ८ सप्टेंबरला स्थगिती देण्यात आली होती.
सुनावणीवेळी वादीतर्फे आलेल्या दोघांकडेही अधिकारपत्र नसल्याने त्यांना दालनाबाहेर काढण्यात आले. प्रतिवादीने अध्यासी अधिकाऱ्यावर आक्षेप घेतल्याने पडदुणे यांनी वादीशी आपला काहीही संबंध नसल्याचे नमूद करून प्रकरण अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यासाठी रोजनाम्यावर शेरा लिहिला.
तहसील कार्यालयातील महसूल सहायक महावीर माळी (३१) यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने फिर्याद दिली. फिर्यादीत आरोपीचे पूर्ण नाव नमूद नाही. पुढील तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या