*मालेगावात शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; अधिकाऱ्यांना माघार*
*मालेगावात शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; अधिकाऱ्यांना माघार*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी/वैराग – नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी मौजे मालेगाव (आर), तालुका बार्शी येथे बुधवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. जमीन देण्यास लेखी नकार दिल्याने मोजणी पूर्ण न होताच अधिकारी माघारी फिरले.
पवनार ते पत्रादेवी या महामार्गाच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांना आगाऊ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी गावात व शेती गटांमध्ये जाऊन मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते महामार्गासाठी जमीन देण्यास तयार नाहीत. याबाबत त्यांनी लेखी जबाब दिला.
विरोधामुळे प्रत्यक्ष मोजणी करता आली नाही. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. उपस्थित शेतकरी प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या गेल्या. मोजणीची कार्यवाही अर्धवट सोडून अधिकारी परतले.
यावेळी बार्शीचे तहसीलदार आर. एफ. शेख, बार्शी पोलिस स्टेशनचे पीआय विक्रम वडणे, वैराग पोलिस स्टेशनचे एपीआय कदबाने, मंडळ अधिकारी मनोजकुमार संपकाळ, तलाठी रेश्मा गायकवाड, कृषी अधिकारी कृष्णनाथ शेळके, ग्रामसेवक वाळके, नगरसेवक कृष्णराज बारबोले, जमीन मोजणी अधिकारी व्ही. एस. भुसनीकर उपस्थित होते. शेतकरी बाजूने संजय नलावडे, पांडुरंग घोडके, नितीन भुसारे, किशोर घोडके, संदेश कुरुंद, नीलेश भुसारे, राहुल नायकवाडी आदी होते.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीबाबत पुढील कार्यवाही कशी होते, याकडे मालेगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या