*बार्शी तालुक्यात संयुक्त पंचनामा पाहणी सुरू; कासारवाडी, कव्हे व बळेवाडीत अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शेतावर भेट*
*बार्शी तालुक्यात संयुक्त पंचनामा पाहणी सुरू; कासारवाडी, कव्हे व बळेवाडीत अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शेतावर भेट*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, २ ऑक्टोबर : खरीप हंगाम २०२६ मधील पावसाच्या तूट व दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू झाले आहेत. तहसीलदार मा. श्री. एफ. आर. शेख व तालुका कृषी अधिकारी श्री. संतोष कोयले यांच्या नेतृत्वाखाली महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मौजे कासारवाडी, कव्हे व बळेवाडी येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.
कासारवाडी येथे तहसीलदार शेख, तालुका कृषी अधिकारी कोयले यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. पिकांची सद्यस्थिती तपासून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
त्यानंतर कव्हे व बळेवाडी गावांतही संयुक्त पाहणी झाली. यावेळी तहसीलदार शेख, तालुका कृषी अधिकारी कोयले यांच्यासोबत ग्राम महसूल अधिकारी श्री. सुतार, सहायक कृषी अधिकारी श्री. पोळ, पिक पाहणी सहायक श्री. झळके, माजी सैनिक श्री. भगवान पोकळे व उपस्थित शेतकरी सहभागी झाले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची तपासणी करून पंचनामे पूर्ण करण्यात आले.
राज्यात २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बार्शी तालुक्यातही महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकांकडून गावोगावी पाहणी सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल शासनाकडे सादर होईल व त्या आधारे शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया पुढे जाईल.
शेतकरी बांधवांनी पंचनाम्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत व ई-पिक पाहणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या