*अवैध सावकारी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील*

*अवैध सावकारी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील* 

KDM NEWS प्रतिनिधी मुंबई : राज्यातील अवैध सावकारीला आळा घालून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना सुलभ व जलद न्याय मिळावा यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत अवैध सावकारीविरोधातील कारवाई आणि प्रकरणनिहाय सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

अवैध सावकारीच्या प्रकरणांसाठी स्पष्ट व निश्चित निकष ठरवून जिल्हा उपनिबंधकांनी गतीने निर्णय घ्यावेत, अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. वरकरणी नियमित खरेदी-विक्रीचे दिसणारे मात्र प्रत्यक्षात अवैध सावकारीशी संबंधित जमीन व्यवहार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षतेने कार्यवाही करावी. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने अहवाल मागवून ती गतीने निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांना पोलीस प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे. दुष्काळी परिस्थितीत अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित बैठका घेऊन आढावा घ्यावा. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत तक्रारी, गुन्हे दाखल करणे, चौकशी तसेच बळकावलेल्या जमीन-मालमत्ता परत मिळवून देण्याची कार्यवाही सुरू असून, अवैध सावकारीला प्रतिबंध करून शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे अकोला, लातूर येथील जिल्हा उपनिबंधक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**