*वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेश पवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; गुन्हा दाखल करून ताब्यात*
*वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेश पवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; गुन्हा दाखल करून ताब्यात*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी सोलापूर : वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेश पवार ( बार्शी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (२८ ऑक्टोबर) दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील ३९ वर्षीय शेतकरी तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याचे आश्वासन देत हवालदार पवार यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने इतकी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर मागणी २० हजारांवर आली आणि शेवटी तडजोडीअंती १० हजार रुपयांवर निश्चित झाली.
तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी सोलापूर एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्याच दिवशी दुपारी १.४० ते ३.३७ या कालावधीत वैराग पोलीस ठाण्यात गोपनीय पडताळणी झाली. यावेळी हवालदाराने पंचांसमक्ष मुलाच्या गुन्ह्यात मदतीसाठी सुरूवातीला २० हजार आणि नंतर १० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
एसीबीने २८ सप्टेंबर आणि ९ ऑक्टोबर रोजी दोनदा सापळा रचला. मात्र तक्रारदार आणि पंचांबाबत संशय आल्याने हवालदाराने रक्कम स्वीकारली नाही. लाच मागणी पडताळणीत सिद्ध झाल्याने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकात पोलीस हवालदार सलीम मुल्ला, संतोष नरोटे, स्वामीराव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी, राजू पवार आणि चालक अक्षय श्रीराम यांचा समावेश होता.
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचाराची माहिती असल्यास निर्भयपणे संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक १०६४, व्हॉट्सअॅप ९४०४००१०६४. सोलापूर कार्यालय : ०२१७-२३१२६६८.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या