*मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत अमित शाह यांची भेट; दुष्काळासाठी विशेष मदतीची मागणी*

*मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीत अमित शाह यांची भेट; दुष्काळासाठी विशेष मदतीची मागणी* 

KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना भेटीत काय झाले ते स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, “देशाचे गृहमंत्री एनडीआरएफचे प्रमुख आणि इंटर-मिनिस्ट्रियल ग्रुपचे अध्यक्ष असतात. दुष्काळाबाबत किंवा एनडीआरएफच्या मदतीबाबतचे प्रस्ताव या ग्रुपकडे जातात. त्यामुळे आम्ही पाठवलेल्या प्रस्तावाची माहिती देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. प्रस्तावाची प्रतही त्यांना दिली.”

त्यांनी अमित शाह यांना सांगितले की, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची समस्या निर्माण होणार आहे. जवळपास ३२ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसत आहे. ८० टक्के तालुके दुष्काळाने पूर्णपणे प्रभावित आहेत. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला विशेष मदत करावी आणि पाठवलेल्या प्रस्तावाबाबत तात्काळ केंद्रीय टीम पाठवावी, अशी विनंती त्यांनी केली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशीही चर्चा झाली. केंद्रीय टीम ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांची पाहणी करून अहवाल एनडीआरएफला सादर करेल. त्या अहवाल आणि राज्याच्या प्रस्तावाच्या आधारे निर्णय घेतला जाईल. प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नियमांच्या चौकटीत जास्तीत जास्त मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असेही आश्वासन मिळाले.

याशिवाय फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. नागपूर विमानतळावरील नवीन टर्मिनलसाठी एअरफोर्सकडे असलेली २७ एकर जागा तात्काळ हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. बैठक सकारात्मक झाली. जागा लवकर हस्तांतरित केली जाईल आणि संबंधित बांधकामाबाबतही सहमती झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन उपस्थित होते.

राज्यात आधीच २६५ आणि नंतर अतिरिक्त तालुक्यांसह एकूण २८४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने नियम बाजूला ठेवत आधीच दुष्काळ जाहीर केला आहे. पिकांच्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**