**बारामती ॲग्रोच्या पाणी वापरावरून राजकीय वाद तापला; रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना जोरदार टोला**

*बारामती ॲग्रोच्या पाणी वापरावरून राजकीय वाद तापला; रोहित पवारांचा राजेंद्र राऊतांना जोरदार टोला* 

KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : उजनी धरणातील पाण्याच्या प्रश्नावरून सुरू झालेला राजकीय वाद आता थेट बारामती ॲग्रोपर्यंत पोहोचला आहे. भाजपचे बार्शी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे कर्जत-जामखेड आमदार रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची झोड उठली आहे.

राजेंद्र राऊत यांनी बारामती ॲग्रोला लक्ष्य करत म्हटले की, कारखान्याला उजनी धरण आणि नीरा नदीतून वर्षभरात सुमारे २५ हजार कोटी लिटर पाणी मिळते. दुष्काळी परिस्थितीत मद्यनिर्मितीसाठी पाणी वापरू नये. ते पाणी शेती आणि पिण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे. तसे न केल्यास बारामती ॲग्रोसमोर तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. “आधी स्वतःच्या कारखान्यातले दारूचे उत्पादन बंद करा आणि मग बोल,” असेही राऊत म्हणाले. त्यांनी रोहित पवारांवर दुटप्पीपणाचा आरोप करत “आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून” अशी टीका केली.

या टीकेला आज रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. “कारखाने आणि डिस्टिलरी कशा चालतात, याची ज्यांना साधी माहिती नाही, त्यांना मी काय उत्तर देणार? पाचवीचा मुलगाही त्यांना उत्तर देऊ शकतो. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी मी माझा वेळ का घालवू?” अशा शब्दांत त्यांनी राऊतांना टोला लगावला.

हा वाद उजनी धरणातील पाणीवाटप, प्रस्तावित एआय डेटा सेंटर आणि इतर प्रकल्पांवरील रोहित पवारांच्या टीकेनंतर तीव्र झाला आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नसताना उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्याचा मुद्दा राजकीय चर्चा गाजवत आहे. राऊतांच्या इशारा आणि पवारांच्या प्रत्युत्तरानंतर राजकीय वर्तुळात पुढील प्रतिक्रियांकडे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**