*बार्शी : भगवंत मंदिरात दिवाळी पाडवा पहाट भक्तिसंगीताने रंगली*
*बार्शी : भगवंत मंदिरात दिवाळी पाडवा पहाट भक्तिसंगीताने रंगली*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : बार्शी येथील भगवंत मंदिरात दिवाळी पाडवा पहाट विशेष संगीत कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. नादब्रह्म संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात भक्तिगीते, अभंग आणि भावगीतांच्या सुरांनी पहाटेचे वातावरण भक्तिमय झाले.
कार्यक्रमाची सुरुवात बसवराज पुरवंत यांनी ‘लंबोदरा हे विघ्नेश्वरम’ या गणेशगीताने केली. त्यानंतर सिया चौबे, लता बांगर, भोसले, मीरा मांजरे, वैशाली देशमुख, रुद्र मांजरे, लोळगे ताई, मेघना वाघमारे, ओजस्वी राऊत यांनी विविध भक्तिगीते सादर केली. यात ‘हा मोगरा’, ‘पंढरीशी जारे आल्यानो संसारा’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, ‘देहाची तिजोरी’, ‘कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात’, ‘अबीर गुलाल’, ‘कैवल्याचा पुतळा’, ‘चिंधी बांधते’, ‘राम गुणगान करी’, ‘हे आदिमा हे अंतिमा’ यांचा समावेश होता.
मयांक सर्वज्ञ यांनी ‘पायोजी मैंने रामरतन धन’ या गीताचे हार्मोनियम वादन केले. वैशाली सोनवणे, कातूरे ताई, प्रतीक्षा अंधारे यांनीही गीते सादर केली. सावंत, देशमुख, भोसले, चौबे आणि ओजस्वी यांनी ‘माझी रेणुका माऊली’ हे गीत समूहाने गायले. रुद्र मांजरे यांनी ‘हरिभजनाविण काळ’ हा अभंग सादर केला. ओजस्वी राऊत, राजवीर भोसले, शिवन्या कोंढारे, रुद्र मांजरे आणि शिवरत्न मांजरे यांनी ‘अच्युतम केशवम्’ हे स्तुतिगीत सादर करून दाद मिळवली. याला तबल्याची साथ पार्थ पाबळे तर हार्मोनियमची साथ मयंक क्षीरसागर यांनी केली.
मृणाली सराफ यांनी ‘काय सांगू आता संतांचे उपकार’ हा अभंग सादर केला. प्रमुख गायक निलेश मांजरे यांनी ‘बाजे मुरलिया बाजे’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ यांसह विविध अभंग सादर करून रसिकांना भक्तिरसात बुडवले. ‘पोटापुरते देई बा विठ्ठला’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
तबल्याची साथ रितेश काजळे, हार्मोनियमची साथ सुदर्शन शिराळकर आणि दिपाली सहस्रबुद्धे तर टाळाची साथ सुहास जोशी यांनी केली. निवेदन बसवराज पुरवंत यांनी केले. या भक्तिसंगीत सोहळ्यामुळे मंदिर परिसरात दिवाळी पाडव्याच्या पहाटे भक्तिमय आणि संगीतमय वातावरण निर्माण झाले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या