*बार्शीसह राज्यभर न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; समान वेतनाची मागणी*
*बार्शीसह राज्यभर न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; समान वेतनाची मागणी*
KDM NEWS प्रतिनिधी बार्शी : समान काम, समान वेतन या तत्त्वावर सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसह राज्यातील दुय्यम व जिल्हा न्यायालयांतील सुमारे ३४ ते ३५ हजार न्यायालयीन कर्मचारी आजपासून (१७ नोव्हेंबर) बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे राज्यभरातील न्यायालयीन कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू आहे. त्याच धर्तीवर दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी मिळावी, ही प्रमुख मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र २१-२२ महिने उलटूनही निर्णय झाला नसल्याने कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला.
यापूर्वी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये काळ्या फिती लावून कामकाज आणि ५ नोव्हेंबरला एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्याने आता बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क), बेलिफ, स्टेनोग्राफर आणि गट ड कर्मचारी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत.
बार्शीसह जिल्हा व तालुका न्यायालयांतील लिपिक, स्टेनो, बेलिफ व शिपाई वर्ग या संपात सामील झाल्याने दिवाणी-फौजदारी कामकाज, नोटीस बजावणी व इतर प्रशासकीय कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, कामाचा दबाव वाढला असला तरी वेतनात असमानता कायम आहे. शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या