*जिल्हा परिषद सेस योजनेतून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कृषी औजारे; २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

*जिल्हा परिषद सेस योजनेतून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कृषी औजारे; २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन* 

*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषद सेस (DBT) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती औजारे व यंत्रसामग्री ५० टक्के किंवा निर्धारित मर्यादेत अनुदानावर उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी केले आहे.

योजनेत पीक संरक्षणासाठी श्री पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप; कृषी अभियांत्रिकीअंतर्गत रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र; सिंचनासाठी ५ एचपी सबमर्सिबल विद्युत पंप संच, डिझेल इंजिन तसेच कडबाकुट्टी, ताडपत्री व स्लरी फिल्टर यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक, दिव्यांग व महिला शेतकरी अर्ज करू शकतात. आवश्यक कागदपत्रांत सातबारा उतारा, आठ-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जात प्रमाणपत्र तर दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांची निवड कृषी समितीमार्फत होईल. निवड झाल्यानंतर एका महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून पसंतीचे औजार खरेदी करावे लागेल. खरेदी केलेली यंत्रसामग्री अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने तपासलेली तसेच बीआयएस किंवा इतर सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणक व तांत्रिक निकषांनुसार असणे बंधनकारक आहे. मंजूर अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर जमा होईल.

इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागाकडे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**