*सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; १० माजी संचालकांचे अर्ज बाद*

*सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; १० माजी संचालकांचे अर्ज बाद* 

KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत मोठा राजकीय उलथापालथ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सिद्धाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक, सुरेश हसापुरे यांच्यासह सुमारे १० माजी संचालकांचे अर्ज नामंजूर केले. २०२४ मध्ये बेकायदेशीर कर्जवाटप आणि बँकेच्या आर्थिक नुकसानीसाठी झालेल्या कारवाई तसेच सहकार कायद्यातील कलम ११०अ अंतर्गत दोन टर्म अपात्रतेच्या तरतुदींनुसार हा निर्णय देण्यात आला.

एकूण २०१ उमेदवारांनी २३८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४१ अर्ज बाद तर ३० दुबार ठरले. वैध अर्जांची संख्या १६७ आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे अर्ज मात्र मंजूर झाल्याने मोहिते-पाटील कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. आमदार राजेंद्र राऊत, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, बाबासाहेब देशमुख यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचे अर्जही वैध ठरले आहेत.

दिग्गजांचे अर्ज बाद झाले तरी राजकीय घराण्यांनी माघार घेतलेली नाही. पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, शंभूराजे जगताप, बाळराजे पाटील, प्रणव परिचारक, सिद्धेश्वर आवताडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, यशवंत शिंदे यांसारख्या पुढील पिढीतील उमेदवार रिंगणात आहेत. काही मतदारसंघांत बिनविरोध निवडणुकीची चिन्हे दिसत आहेत.

बाद झालेल्या उमेदवारांना विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची संधी आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे. २६ नोव्हेंबरला मतदान आणि २७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक आता सहकार क्षेत्रापेक्षा जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनली आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बार्शी तालुक्यात निसर्गाचा कोप: श्रीपतपिंपरी येथे वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू**

**दुधाच्या नावाखाली कृत्रिम 'विष'चा पुरवठा; FDA-पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, १३ जण ताब्यात**

**बार्शी तालुक्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या; बिबट्या व वाघाची दहशत, बार्शीतील चुंबमध्ये शेतकऱ्यांच्या गाईवर हल्ला**